संक्रांतीचा सण झाला की दिवस मोठा होतो आणि थंडी कणाकणानं कमी होते आणि पुढे साधारण महिना सव्वा महिन्यात महाशिवरात्र झाली की ती पळून जाते असं आपल्या घरातील वयस्कर मंडळी त्यांच्या निरीक्षणावरून सांगतात, जे अगदी खरं आहे. आता बघा नं, फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच किती गरम व्हायला लागलंय. रात्री आणि पहाटे थोडी थंडी पडतेय. त्यामुळे नक्की काय करावं असं confusion होतंय. W. A. वर त्यावर जोक्स यायलाही सुरुवात झालीय.

समझ में नहीं आ रहा है, की मौसम कौनसा चल रहा है
मच्छर काट रहे है, कम्बल भी ओढ रहे है
पंखा भी चल रहा है
नहा गरम पानी से रहे है और पी ठंडा पानी रहे है
लगता है कोनो फिरकी ले रहा है

मला असं लिहिणाऱ्या लोकांचं मोठं कौतुक वाटतं. आपल्या मनातल्या भावना अगदी अचूक लिहितात हे लोक. तर असो. एकूण असं आहे आणि ते काही जगावेगळ नाहीये. यालाच आयुर्वेद ” ऋतुसंधी ” असं म्हणतो. म्हणजे दोन ऋतूंना जोडणारा काळ.या काळात आधीच्या ऋतूचे थोडे वातावरण आणि येणाऱ्या ऋतूची थोडी लक्षणे असं mix चित्र असतं. त्यामुळेच सध्या थोडी ठंडी,थोडी गर्मी असं जाणवतंय.

महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला नेहमीच पुढे जायची घाई झालेली असते आणि त्यामुळे अनेक आरोग्य विषयक तक्रारी आपण हाताने ओढवून घेतो. विशेषतः या वसंत ऋतूत हे हमखास घडतंच. आपले सगळे स्वेटर, मफलर, blankets गुंडाळून आपण आत ठेवून देतो. डोक्यावर गरगर पंखा फिरू लागतो, रात्री A / C चालू होतात, माळ्यावर ठेवलेले माठ खाली येतात, फ्रीजमध्ये गार पाण्याच्या बाटल्या, शीतपेये, आईस्क्रीम लगेच विराजमान होतात, घराबाहेर पडलं की उसाचा रस किंवा milkshake घ्यायला पावलं वळू लागतात आणि नेमकं इथेच आपण चुकतो.

आपल्याला प्रत्येक ऋतूत निरोगी राह्यचं असेल तर या संधीकाळात खूप काळजी घ्यावी लागते. आधीच्या ऋतूतील आहार, विहार हळूहळू कमी करून नवीन आहार विहार वाढवावा लागतो. हिवाळ्यात आपली पचनशक्ती उत्तम असते, पौष्टिक फळ, भाज्या, मेवा भरपूर मिळतो आणि या सगळ्याची शरीराला गरजही असते म्हणून आपण ते खातो. त्या मानाने पाणी किंवा इतर द्रव पदार्थ कमी घेतो कारण त्याची तितकीशी गरज नसते. घामही येत नाही त्यामुळे कमी द्रव घेतले तरी भागते. रात्र मोठी असते. उबदार कपडे आणि पांघरूण यामुळे भरपूर झोपही घेतली जाते. गोड पदार्थ खूप खाल्ले जातात. या सगळ्या आहार विहारामुळे शरीरात कफ दोष भरपूर साठतो. थंड वातावरणामुळे तो बाहेर पडत नाही एव्हढंच !

वसंत ऋतूत ऊन वाढू लागतं, रात्र छोटी होते, उष्णता वाढते, घाम यायला लागतो. शरीराला ओलाव्याची गरज भासू लागते. उसाचा रस, आंब्याचा रस, कैरी, काकडी, टरबूज, खरबूज अशी फळ या ऋतूत निर्माण होण्याचं कारणच ते आहे. पण हे सगळं घाईनं खायला प्यायला सुरुवात करून चालत नाही. जेव्हा ऊन वाढू लागतं तेव्हा शरीरातील साठलेला कफ पातळ व्हायला लागतो आणि सर्दी, खोकल्यासारखे अनेक आजार निर्माण करतो, बऱ्याच जणांचे पित्त उफाळते, त्वचा विकार वाढतात. तसंच अनेक विषाणूजन्य आजार जसे, गोवर, कांजिण्या, नागीण असे अचानक उद्भवतात.

हे सगळं बाधू नये म्हणून या संधीकाळात शुद्धिक्रिया कराव्या असे आयुर्वेद सुचवतो. वमन या अत्यंत परिणामकारक क्रियेद्वारे साचलेला कफ जर काढून टाकला तर स्वास्थ्य अबाधित राहते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने या दिवसात वमन करायलाच हवे.

एप्रिल, मे महिना येईपर्यंत ऋतुचर्या हळूहळू क्रमाने बदलावी. नाहीतर घसा खराब होणे, थंडी ताप या आजारांना निमंत्रण मिळू शकते. कडाक्याचा उन्हाळा सुरु झाल्यावर मात्र भरपूर पातळ आणि गोड पदार्थ, गार पाणी वगैरे घेण्यास हरकत नाही.

पहाटे कोकिळेचे स्वर लवकरच येणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देतायत. so, wish you all a happy spring. पण जरा सांभाळून आणि तब्येतीची काळजी घेऊन ! मार्गदर्शन आणि सेवा यासाठी आयु: श्री सिद्ध आहेच.

वैद्य राजश्री कुलकर्णी
M. D. (आयुर्वेद)
www.ayushree.com